जळगाव : प्रतिनिधी
मुक्ताईनगरकडून जळगाव- जामोदकडे भरधाव जाणाऱ्या एस. टी. बस व राखेचा डंपर यांच्यात धडक झाली. या अपघातात डंपर व बसचालक आणि वाहकांसह दहा प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजता मुक्ताईनगरजवळ घडली.
मुक्ताईनगरची बस (एमएच १३ सीयू ६९३१) ही मुक्ताईनगर येथून जळगाव जामोदकडे जात होती. सकाळी साडेआठच्या सुमारास या बसने चिंचखेडा (बु.) ते वढोदा गावादरम्यान खांडवीकडून येणाऱ्या राख वाहतूक करणाऱ्या रिकाम्या डंपरला समोरासमोर धडक दिली. त्यात डंपरचालक सुनील बाबूलाल काजदेकर (रा. उमापूर, ता. जळगाव जामोद), बसचालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. वरणगाव), वाहक प्रतिमा शांताराम अहिरे (रा. भुसावळ) यांच्यासह बाबूराव ठोसर, यमुनाबाई ठोसर (रा. चिंचखेडा बुदूक), गणेश कोळी, इस्माईल खाँ इम्रान खाँ, सुधाकर लाहुळकार, निवृत्ती ढोण, शुभांगी लाहुळकर (सर्व रा. पारंबी) हे जखमी झाले? अपघाताची माहिती कळताच शिवसेना तालुका उपप्रमुख नवनीत पाटील, अविनाश वाढे, दिलीप भोलाणकर, ज्ञानेश्वर तायडे, विष्णू इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कुन्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार होऊन काही जखमींना मुक्ताईनगर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी डंपरमालक भागवत गजानन तायडे (रा. पिंपळगाव काळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलिस नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.