जळगाव : प्रतिनिधी
सध्या जिल्हा पोलिस दलाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून, शनिवारी मध्यरात्री जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अचानक नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. यात पाच तासांत १ हजार ६०० वाहनांची तर १०७ हॉटेल्स, लॉज, ढाब्यांची तपासणी करण्यात आली.
शनिवारी रात्री ११ वाजेपासून ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीसाठी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांच्यासह ४० पोलिस अधिकारी व २१५ पोलिस अंमलदार नेमण्यात आले होते. या पोलिसांकडून मध्यरात्री १६०० वाहनांची तपासणी करून त्यांच्याजवळून १ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय रेकॉर्डवरील १३२ गुन्हेगारांचीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. तसेच १२४ जणांना समन्स व ६५ जणांना बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तर ५३ जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले.