जळगाव : प्रतिनिधी
शाळेच्या १५० विद्यार्थ्यांची आपल्याकडून आरोग्य तपासणी करावयाची आहे असे सांगून सायबर ठगाने डॉक्टराला १ लाख २४ हजार ९९७ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डॉक्टराच्या फिर्यादीवरून सायबर ठगाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील नवीन बसस्थानक परिसरामध्ये डॉ. प्रमोद वसंत जोशी हे कुटुंबासह राहतात. रविवारी सकाळी १०.३५ वाजता त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. आपण जळगाव केंद्रीय विद्यालय येथून सतीश कुमार बोलत असून मिल्ट्रीमध्ये अधिकारी आहे. आमच्या शाळेच्या १५० विद्यार्थ्यांची तुमच्याकडून आरोग्य तपासणी करावयाची असून तुमच्या दवाखान्याचा पत्ता माझ्या व्हॉट्सअॅपवर पाठवा, असे त्याने सांगितले. जोशी यांनी संबंधिताच्या मोबाईलवर पत्ता पाठविला. रात्री पुन्हा त्याच क्रमांकावरून त्यांना कॉल आल्यावर त्या व्यक्तीने जोशी यांना त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मागून त्यावर व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा करू म्हणाला. काही मिनिटांनी त्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून तपासणीची आगाऊ रक्कम पाठवित असन त्यासाठी मी जसे सांगेल त्याप्रमाणे मोबाईलवर प्रक्रिया करा, असे सांगितले. त्याप्रमाणे जोशी यांनी ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया केल्यावर संबंधित व्यक्तीने सुरुवातीला ९ हजार ९९९ रुपये पाठविण्यास सांगितले. नंतर रक्कम प्राप्त झाली नाही म्हणून वेळोवेळी एकूण १ लाख २४ हजार रुपयांची रक्कम उकळली.