जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथील बस स्थानक परिसरात पोलिसावर हल्ला करणाऱ्या गुंडांची आज २१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी चांगलीच धिंड काढली. यावेळी पोलिसांनी फटके मारत त्यांना पोलीस स्टेशनला नेले, यावेळी रस्त्याला जणू काही यात्रेचे स्वरूप आले होते. त्यामुळे त्या गुन्हेगाराची दहशत पोलिसांनी संपविली आहे.
१४ जानेवारी रोजी पहूर येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे कर्तव्य बजावत असताना पहूर बस स्थानकावर फिरोज शेख सुपडू शेख व त्याचा साथीदार खाजा तडवी यांची दुचाकि रस्त्यावर उभी असल्यामुळे दुचाकी बाजूला घे असे बोलल्याचा राग आल्यामुळे दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना मारहाण करून डोक्याला व हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्या दिवसापासून आरोपी फिरोज शेख सुपडू शेख व खाजा तडवी हे फरार होते.
कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून गंभीर दुखापत करणाऱ्या दोघं तरुणांना १९ रोजी रात्री १०ते१०.३०वाजेच्या सुमारास पहूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने परभणी येथून अटक केली होती. २० रोजी दुपारी दोंघा संशयितांना जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
गेल्या पाच दिवसापासून तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांच्या मागावर होते.मोबाईलचे तांत्रिक लोकेशन वरून आरोपी यांचा मार्ग काढून काल रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास परभणी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एका जंगलामध्ये आरोपी लपून बसले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेले असता त्यांनी पोलिसांवरच दगडफेक करून पोलिसांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्यांना पकडले असता आरोपी खाजा तडवी याने या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची रिवाल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या हिमतीने दोघांना पकडण्यात यश मिळविले.
दि २० रोजी मध्यरात्री दोन्ही आरोपींना पहूर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली .आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक चौकापासून त्यांना फटके मारत पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघ्यांची तोबा गर्दी झाली होती यामुळे जणू काही रस्त्याला यात्रेची स्वरूप झाले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.