जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त ठरलेली नोकर भरती रद्द करण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपचे आ.मंगेश चव्हाण यांनी दिली. खडसेंच्या यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्ब्ल ९ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रूपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.
आज २१ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संघाच्या कामाकाजाचा आढावा तसेच आर्थिक माहिती घेण्यात आली. संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत ९ कोटी ६७ लाख रूपयांचा तोटा झाल्याची माहिती या वेळी मिळाली. यात ऑगस्ट २०२२ या महिन्यात प्रशासकीय मंडळ होते. या काळात २० लाख रूपये नफा झाला, तर आता मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात ९५ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या महिनाभराच्या काळात संघात होणारा अतिरिक्त खर्च कमी केला आहे. अतिरिक्त असलेले तब्बल २० कामगार कमी केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा दूध संघात सन २०२१मध्ये १०४ कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात आली होती. राखीव जागाच्या प्रश्नावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे न्यायालयाने या नोकर भरतीला ‘स्थगिती’ दिली होती. नोकरभरतीचा प्रश्न संघाच्या निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात गाजला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असताना या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. खडसे यांचा पराभव झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सत्ता आली. आता या नवीन संचालक मंडळाने वादग्रस्त ठरलेली ही नोकर भरतीच रद्द केली आहे.
याबाबत चेअरमन चव्हाण यांनी सांगितले की, ही नोकरभरती रद्द करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ही नोकर भरती रद्द झाली माहिती आम्ही न्यायालयालाही देणार आहोत. आता संघ तोट्यात असल्यामुळे नोकरभरती करण्यात येणार नाही. ज्यावेळी संघ नफ्यात येईल, त्यावेळी ही भरती करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा दूध संघाचे बटर वाई येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. हा खर्च नेहमीच वादात होता, त्यामुळे आता हे कोल्ड स्टोरेज संघाच्या आवारातच उभारण्यात आले आहे. त्याच ठिकाणी बटर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संघाचे वर्षाला १५ लाख रूपये वाचणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.