जळगाव : प्रतिनिधी
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर वडगाव गावाजवळ बैलगाडीला भरधाव आलेल्या चारचाकीने धडक दिल्याने बैलगाडी स्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. प्रवीण काशीनाथ पाटील (वय ४०) असे मृताचे शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी प्रवीण पाटील हे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरून बैलगाडीने शेतात जात हाेतेे. रावेरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमपी ०४ सीपी ६३८० या क्रमांकाच्या ह्युंदाईची एक्सेंट कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या कारने बैल गाडीला मागून जोरदार धडक दिली.
त्यामुळे शेतकरी प्रवीण पाटील हे बैलगाडीतून फेकले जावून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागून ते जागीच ठार झाले. तसेच बैलगाडी कारच्या धडकेने दामू पाटील यांच्या शेतात फेकली गेल्याने एका बैलाचे शिंग देखील तुटले आहे. ही कार मध्य प्रदेशातील असून रुग्णास घेऊन जळगावला जात होती. अपघात प्रकरणी वडगाव येथील पोलिस पाटील संजय वाघोदे यांनी निंभोरा पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
घटनास्थळी निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी भेट दिली. त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. निंभोरा पोलिस ठाण्यात वडगाव येथील मृत पाटील यांचे नातेवाईक धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास पाेलिस उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे करत आहेत.