पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अघोरी कृत्याचा कळस अजून हि राज्यात पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे अनेक ठिकाणी निष्पाप लोकांचे बळी जात असतांना देखील अशा घटना थांबत नाही. असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे.
मुलगा होण्यासाठी सासरच्या लाेकांनी सुनेवर प्रत्येक अमावास्येच्या दिवशी घरात आणि स्मशानभूमीत अघोरी पूजा करून मृतदेहाची हाडे आणि राख घरी खाण्यास भाग पाडले. पुण्यातील धायरीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव (सर्व रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत २८ वर्षीय सुनेने तक्रार दाखल केली आहे. पोकळे कुटुंबीय हे घरामध्ये सुख-शांती नांदावी, भरभराट व्हावी आणि मूलबाळ व्हावे यासाठी सुनेवर पती, सासू व सासऱ्यांनी अघोरी पूजा केली. पोकळे कुटुंबीय हे सुनेला मानसिक त्रासदेखील द्यायचे, अशी तक्रार पोलिसांकडे आली आहे. २७ एप्रिल २०१९ पासून हा प्रकार सुरू होता. लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा सुनेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी घरच्यांनी पुत्रप्राप्तीसाठी महिलेवर अघोरी पूजा केली. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडित महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात धाव घेत सासरच्या लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.