जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्एयातील साकेगावातून नकली नोटा बाळगल्याप्रकरणी एका महिलेसह एकाला भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील साकेगावातील एका परिसरात राहणाऱ्या महिलेजवळ तब्बल २१ हजार ९०० रुपयांचे नकली नोटा बाळगणे भोवले आहे. दि १९ रोजी साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात एका महिलेसह एका पुरुषास अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या. यामध्ये संशयित आरोपी हनीफ अहमद शरीफ देशमुख रा.लाखोली, नाचनखेडा ता.जामनेर याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात महिलेकडून १०० व ५० रुपये दराच्या एकूण २१ हजार ९०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहेत.