भुसावळ प्रतिनिधी | शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा परिसरातील ४२ वर्षीय तरुणाने आजाराला कंटाळून तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १० जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश जगदीश सपकाळे (वय ४२, जुना सातारा, कोळीवाडा, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. योगेश सपकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर आजाराने त्रस्त होते व या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात उडी घेतली. खडकावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
तापी पात्रात आत्महत्या केल्याची माहिती कळताच तापी पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. भुसावळ शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ट्रामा सेंटरमध्ये हलवला. रात्री शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येप्रकरणी मयताचा भाऊ मनोज जगदीश सपकाळे यांनी खबर दिल्यावरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार संजय कंखरे करीत आहेत.