जळगाव प्रतिनिधी । शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत खासगी नोकरदार असलेले चेतन विनायक नेहेते (वय-३६, रा. राजोरे, ता. यावल) यांची २६ लाख ७४ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवार, ९ जून रोजी दुपारी ४ वाजता सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, १० मार्च ते ६ जून या दरम्यान अज्ञात दोन जणांनी चेतन नेहेते यांच्याशी संपर्क साधून व्हाटस् ॲप ग्रुप व टेलिग्रामला जॉईन होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवून पोर्टलवर नोंदणी करायला लावली. त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा विश्वास संपादन केला व ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ असे अमिष दाखविले. त्यातून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यावर २६ लाख ७४ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर कोणताही परतावा त्यांना देण्यात आला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चेतन नेहेते यांनी रविवारी ९ जून रोजी दुपारी ४ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.