जळगाव- प्रतिनिधी । भुसावळहून जळगावला येणाऱ्या बसमधून दोन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली होती. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी बस स्थानकात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) याच्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील विठ्ठल पेठ येथील राहणारे सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. शनिवार १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानक येथे ते बसमधून उतरले असता, त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष लक्ष्मण वानखेडे (वय ४३, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांच्या शर्टाच्या खिशातून देखील चोरीला गेला होता. यावेळी बारी यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश मानगांवकर यांनी लागलीच गुन्हेशोध पथकातील पोहेकॉ सलिम तडवी, पोकॉ तुषार पाटील व जयेश मोरे यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल याला बसस्थानक आवारातून दुपारी ४ वाजता ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरलेले दोन मोबाईल मिळून आले. पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी मोरे ह्या करीत आहे.