जळगाव प्रतिनिधी । तुकारामवाडी परिसरात दहशत निर्माण करून मारहाण, शिवीगाळ असे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार भुषण उर्फ भासा विजय माळी (वय २४, तुकारामवाडी, जळगाव ) यांच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी आदेश काढलेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात हद्दीत राहणारा भुषण माळी याच्या विरुध्द वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची तुकारामवाडी व परिसरात प्रचंड दहशत होती. त्याच्या व त्याच्या टोळीच्या नावाची दहशत निर्माण करत सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करुन, शिवीगाळ करण्याचेही अनेक प्रकार केले. त्याच्या विरुध्द भूषण माळी यांच्यावर एकूण १३ वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार देखील करण्यात आले होते. हद्दपारीनंतर देखील त्याने गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले होते. तुकारामवाडी परिसरात त्याच्या साथीदारांसह एका घरात घुसून तोडफोड केलेली होती. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर आळा बसावा यासाठी त्याच्या विरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. गुरूवारी ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले. हा आदेश पारीत झाल्यानंतर, भुषण माळीला कोल्हापुर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.