जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने २ अनोळखी इसमांचे नातेवाईक मिळून न आल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजीनगर येथे स्मशानभूमीमध्ये दहन करण्यात आले. या वेळेला सर्व धार्मिक विधी देखील करण्यात आला.
मागील आठवड्यात अनेक अनोळखी इसमांचा मृत्यू झाला होता. या मृत्यू मागे उष्माघाताची शक्यता वर्तवली जात आहे. अनोळखी मृतदेहांचे कुठल्याही प्रकारे ओळख पटलेली नव्हती. अखेर त्यांचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अशा वेळेला अनोळखी इसमाच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे येत नसताना गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
कक्षाच्या वतीने आरोग्यदूत शिवाजी रामदास पाटील यांनी बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणारे इसाक बागवान यांच्यासह सोपान महाजन, निवास कोळी यांना सोबत घेत छत्रपती शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत जाऊन तेथे सर्व विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पाटील यांच्या या सामाजिक कृतीमुळे मानवता अजून जिवंत आहे हे दिसून आले आहे.