अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पैलास पोलीस चौकीसमोरून मालवाहू वाहनातून दाटीवाटीने कोंबून गुरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांवर अमळनेर पोलीसांनी बुधवार २९ मे रोजी दुपारी ३ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर शहरातील पैलास पोलीस चौकातून मालवाहू वाहतून दोन बैल व २ म्हशीचे पारडून यांची दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने बुधवारी २९ मे रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १२ क्यूजी ९४९८) पकडले. यात दोन बैल व दोन म्हशीचे पारडू आढळून आले. त्यांची निर्दयतेने कोंबून वाहतूक करतांना निष्पन्नात आले. त्यानुसार पोलीसांनी वाहन ताब्यात घेतले. तर गुरांची सुटका करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक हिमालय गोरख धनगर रा. पैलाड, अमळनेर आणि फराज खान हमीद खान रा. बुध्द विहार जवळ, फरशी रोड, अमळनेर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.