मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी कुविख्यात डॉन छोटा राजन याला दोषी ठरविण्यात आले आहे. त्याला मकोका अंतर्गत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १६ लाख रूपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या ४ मे २००१ रोजी झाली होती. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टीकडून ५० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना २०१३ मध्येच न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता छोटा राजन यालाही शिक्षा झाली आहे.
छोटा राजन तिहार कारागृहात
छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. त्याला इंडिनेशियामध्ये अटक करुन ऑक्टोंबर २०१५ मध्ये भारतात आणले गेले. तेव्हापासून तो नवी दिल्लीतील तिहारमधील जेल नंबर २ मध्ये आहे. हा सेल उच्च सुरक्षा असणारा आहे. कधीकाळी दाऊद इब्राहीमचा जवळचा असणारा छोटा राजन १९९३ मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोटानंतर दाऊद गँगपासून वेगळा झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात गँगवार होत राहिले होते.