मुंबई वृत्तसेवा । गेल्या महिन्यापासून राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे, दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये ५० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. दरम्यान आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी देखील आहे. हवामान खात्यानुसार येत्या २४ तासात मान्सू केरळ किनारपट्टीवर दाखल होत आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात मान्सू दाखल होत असल्याने लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांसाठीही हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. ३० मेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काहीप्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम आणि बंगालमध्येही हवामान बदलणार आहे. या राज्यात पुढील 5 दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. येत्या 10 किंवा 11 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर 15 जूनपासून पुढे तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.