पुणे वृत्तसेवा । पुणे शहरातील कल्याणी नगरात हीट ॲण्ड रन प्रकरण चांगलेच तापले आहे. यात एका मागून एक धक्कादायक महिती समोर येत आहे. अपघातात जबाबदार असलेल्या अल्पवयीन मुलींना वाचविण्यासाठी त्याच्या वडीलांकडून डॉक्टरांवर दबाव टाकून ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ३ लाख रूपये देण्यात आल्याचे समोर आले. या आरोपीखाली संशयित आरोपी डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली होती.तर आता यातील दोनही डॉक्टरांना निलंबित करून लाचेचे वाढीव कलम लावण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
ससून प्रकरणात दोषी असलेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबीत करा असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागासमोर ठेवला आहे. ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटातील आरोपी डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला आहे. त्चयाप्रमाणे त्यांच्यावरील गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची एसीबी कडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाबाबत लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान याप्रकरणाचा तपास सुरू असून मंगळवारी पोलिसांकडून डॉक्टर तावरेच्या घराची झडती घेण्यात आली. डॉ. तावरे हा कॅम्प परिसरात राहतो. त्याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रं आणि साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान ज्या रात्री कल्याणीनगरमध्ये हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलासोबत त्याचे दोन मित्रही होते. त्यांचा काल (मंगळवार) संध्याकाळी पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला. अपघाता वेळी कार मध्ये उपस्थित असणाऱ्या अल्पवयीन मित्रांचा पुणे पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवला. तब्बल २ तास त्यांचा जबाब नोंदवण्यात येत होता. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांकडून त्या दिवशी घडलेल्या घटनेची संपूर्ण, सविस्तर हकीकत जाणून घेतल्याचे समोर आले आहे. यात चौकशीत अजून काय काय माहिती समोर येते ते लवकरच समजेल..