जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद येथे १२ मे रोजी अज्ञात दरोडेखोरांनी कापूस व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेत कुठलेही सीसीटीव्ही फुटेज, दरोडेखोरांचे वर्णन, पुरेसे धागेदोरे उपलब्ध नसताना केवळ “क्राईम स्टडी” करून पोलिसांनी तिघा संशयितांना थेट मध्यप्रदेशातून मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २७ रोजी सायंकाळी ५ वाजता दिली.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद गावात १२ मे रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान कापूस व्यापारी धर्मराज पाटील यांच्या घरात सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लोखंडी व लाकडी रॉडने पाटील परिवाराला मारहाण केली होती. तसेच घरातील दागिने, मोबाईल असा १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कुठलाही धागा संशयितांनी ठेवलेला नव्हता. त्यामुळे आव्हानात्मक या गुन्ह्यात पोलिसांनी जुन्या गुन्ह्यांचा व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला.
त्यानुसार या घटनेतील मध्यप्रदेशातील भामपूर येथील अतिदुर्गम भागात पोलिसांनी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. यात कालूसिंग हुजारिया बारेला (वय ५२, रा. भामपूर ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश), सुनील मुरीलाल बारेला (वय २१, रा. बुलवानीया ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडे दागिने, बोलेरो कार, दुचाकी, दरोड्याचे साहित्य असे मिळून आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी यांनी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली.