जळगाव प्रतिनिधी ।
गुजरात राज्याची पासिंग असलेल्या तीन ट्रकमधून गुरांची वाहतूक होत असताना २७ मोठे गुरे व सहा वासरांची सुटका करून ती कुसुंबा येथील गोशाळेत नेण्यात आली. रविवार २७ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ही वाहने आकाशवाणी चौकात अडविली व त्याची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी ती गोशाळेत सोडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरत येथून (जीजे ०२, झेड झेड ६४८९), (जीजे ०२, झेड झेड ७४७९) व (जीजे ३१, टी २७६०) या तीन ट्रकमध्ये २७ मोठे गुरे व सहा वासरांची वाहतूक होत असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी ही वाहने आकाशवाणी चौकात अडविले. याविषयी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह सहकारी तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारीदेखील आकाशवाणी चौकात पोहचले. वाहनांची तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आले. त्यामुळे ही वाहने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
याविषयी ट्रकचालक व क्लीनरला विचारणा केली असता ही गुरे यवतमाळ येथे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही गुरे छत्रपती संभाजीनगर येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महानगराध्यक्ष मनोज बाविस्कर व अन्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांनी ही वाहने थेट कुसुंबा येथील गोशाळेत नेऊन गुरांची तेथे सुटका केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.