जळगाव प्रतिनिधी ।
जळगाव येथील एमआयडीसी वखार महामंडळात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे काही वेळ बंद झाल्याने खळबळ उडाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी ९ ते ९.०४ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या वृत्ताला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील दुजोरा दिला आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी जिल्हाभरात मतदान झाले आहे. दरम्यान या मतदानाचे ईव्हीएम मशीन हे जळगाव शहरातील एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या शासकीय गोदामच्या स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आले आहे. या ईव्हीएम मशीनसाठी कडक सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहे. यात सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांची सुरक्षा लावण्यात आली आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही येता जाता येत नाही. दरम्यान या ठिकाणी रविवारी २५ मे रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काही काळ ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले ४ मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या संदर्भात जळगाव लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी फोन वरून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती कळविली.
यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटर वरून इन्व्हर्टरवर वीजपुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेरेचे डिस्प्ले बंद झाले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले असले तरी मात्र सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध असून इतर व्हिडिओ शूटिंग केली असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
दरम्यान स्ट्रॉंग रूममध्ये महत्त्वाच्या आणि शासकीय अधिकारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही जाण्यास सक्त मनाई आहे. परंतु या ठिकाणी नियुक्त असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय आणि वरिष्ठांचा दबाव टाकून काही भाजपचे पदाधिकारी हे आतमध्ये जाऊन विनाकारण शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात काही भाजपचे पदाधिकारी यांनी आज रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास येऊन येथे नियुक्त असलेले पोलीस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी व त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या नावाचा उल्लेख करत आम्हाला आत जाऊ द्या असे सांगण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान यावर कोणी अंकुश ठेवेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.