जळगाव प्रतिनिधी ।
रामदेववाडी अपघात प्रकरणी तिसरा संशयित ध्रुव नीलेश सोनवणे (१९, रा. गायत्रीनगर, जळगाव) यालाही पोलिसांनी अटक केले आहे. तो पुणे येथे जाण्यासाठी निघाला असतानाच पोलिसांनी त्याला उचलले. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जळगाव तालुक्यातील रामदेववाडीजवळ ७ मे रोजी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुलांचा व भाचा असा चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखिलेश संजय पवार व अर्णव अभिषेक कौल या दोघांना २३ मे रोजी ताब्यात घेऊन जळगावात आणले. त्यांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आणखी एका जणाचा समावेश असल्याचे या पूर्वीच समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी ध्रुव सोनवणे याला अटक केल्याची माहिती तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.