जळगाव प्रतिनिधी ।
बाहेरून काम आटोपून खोलीकडे परत जात असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात भरधाव दुचाकी झाडाला धडकून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (केसीएन) गुरुवारी २३ मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नीरज लीलाधर भामरे (वय २३, रा. मोराणे प्र. न. ता. जि. धुळे, ह. मु. स्टाफ क्वार्टर, उमवी नगर, कबचौ उमविद्यापीठ परिसर ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील लीलाधर असून ते विद्यापीठाचेच कर्मचारी आहे. नीरजची आई, बहीण, मावशी हे काही वर्षांपूर्वी नाशिकवरून परतताना झालेल्या कार अपघातात मयत झाले आहेत. (केसीएन) नीरज हा विद्यापीठात बी. टेक च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.
नीरज हा गुरुवारी २३ रोजी विद्यापीठाबाहेर दुपारी काही कामानिमित्त गेलेला होता. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या गेट मधून आत शिरल्यावर काही अंतरावर त्याची भरधाव दुचाकी हि एका झाडाला जोरदार धडकली. या धडकेत त्याच्या चेहऱ्याला, डोक्याला गंभीर मार लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. (केसीएन) शुक्रवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांना शोक अनावर झालेला होता. याप्रकरणी याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.