जळगाव : प्रतिनिधी
पाचोरा रस्त्यावर असलेल्या रामदेववाडी गावाजवळ दि.७ मे रोजी भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला होता. गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासाधिकारी, सरकार पक्ष आणि संशयितांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दोघांना सोमवार २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण वय-२६ या आशासेविका ह्या ७ मे मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्या मुलगा सोहम वय-७, सोहमेश वय-४ आणि १६ वर्षीय भाचा लक्ष्मण नाईक असे चौघे इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक (एमएच१९ ईई ८९२५) ने शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या भरधाव कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही६७६७) ने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रामदेव वाडी अपघात प्रकरणी संशयीत आरोपी अर्णव अभिषेक कौल, अखिलेश संजय पवार यांना पोलिसांनी अटक करुन शुक्रवारी २४ मे रोजज दुपारी ३ वाजता न्या. वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी, इतर २ आरोपींना पकडणे, आणखी गांजा होता का? याचा शोध घेणे, दुसरी कार का आली होती, दोन्ही वाहनात शर्यत सुरु होती का? याचा तपास करण्याकामी १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षातर्फे अँड.स्वाती निकम यांनी कलम ३०४ ची बाजू मांडत संशयीत सज्ञान असून भरधाव वाहन चालवण्याने अपघात होऊ शकतो याची त्यांना माहिती होती. वाहनात गांजा मिळून आला असून गांजा बाळगणे देखील गुन्हा आहे. तसेच पोलीस रिमांडमधील मुद्द्यांचा विचार करता पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
अर्णव कौल याच्यातर्फे बाजू मांडताना अँड.प्रकाश बी. पाटील यांनी, अर्णव उपचारार्थ दाखल असताना मुंबईत आझादनगर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. वाहन कोण चालवत होते याचा उल्लेख फिर्यादीत नाही, त्यामुळे गुन्ह्यात कलम ३०४ ऐवजी ३०४ अ लावण्यात यावा, फिर्यादीला अनोळखी व्यक्तीने अपघाताची माहिती दिली, त्याबद्दल आणि वाहनाबद्दल फिर्यादीत सविस्तर माहिती नाही. जमाव आल्यानंतर देखील ते पळून गेले नाही त्यामुळे ते दोषी होते असे दिसत नाही. उलट २ लोक पळून गेले. संशयीत आरोपींना जमावाच्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. जमावाविरुद्ध पोलिसांनी ३०७ का दाखल केला नाही. चालकाचे नाव निष्पन्न होईल तेव्हा त्याच्यावर कलम ३०४ लावता येईल. गांजा आणून ठेवला असल्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली.
अखिलेश पवार याच्यातर्फे अँड.सागर चित्रे यांनी, फिर्यादी आणि संशयीत एकमेकांना ओळखत नव्हते. दुचाकीवर ४ लोक बसून आले होते. २७९ कलम फक्त चालकाला लागू होईल. अखिलेशची अटक नियमबाह्य आहे. ३०४ दाखवून पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. खुनाच्या गुन्ह्यात देखील पोलीस इतकी कोठडी मागत नाही. सलमान खान गुन्ह्याच्या प्रकरणात ३०४ अ आणि नंतर ३०४ लावण्यात आला आणि ५ वर्ष कोठडी सुनावण्यात आली. कमाल खान आणि पोलीस कर्मचारी रविंद्र पाटील यांना आरोपी करण्यात आले नाही. आपल्याला ते देखील बघावे लागेल. वाहन कोण चालवत होते हे स्पष्ट नाही. ३०४ कलम लागत नसेल तर थेट कलम ५० लागेल. गांजा सारखा पदार्थ असे फिर्यादीने म्हटले आहे. आमचा अशील केवळ १९ वर्षाचा विद्यार्थी असून त्याच्या स्वातंत्र्याशी खेळले जात आहे. एनडीपीएस कायद्यात अनेक बाबी आहेत. १७ दिवस पोलिसांना चौकशी करण्याची संधी होती, ते का केले नाही असा प्रश्न आहे. तिसरा संशयीत कुठे आहे. एका खटल्यात पोलिसांना नियमबाह्य अटक केल्याने भरपाई द्यावी लागली आहे, असे त्यांनी न्यायालयात मांडले.
तपासाधिकारी संदीप गावीत म्हणाले, संशयीत अखिलेश पवार याने जबाबात वाहन अर्णव कौल चालवित असल्याचे सांगितले. वळण रस्त्यावर वाहनाच वेग ३० मर्यादित हवा असताना तो नियंत्रणात नव्हता, असे सांगितले. त्यावर अँड.अकील इस्माईल यांनी अर्णव वाहन चालवत असल्याचा रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख नाही. तसेच जर अर्णव वाहन चालवत होता तर अखिलेश याचा संबंधच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि तपासअधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने दोघांना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.