राज्यात गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या युवा संघर्ष यात्रेची सांगता आज नागपुरात झाली. झिरो माइल शिळेजवळ दुपारी १ वाजता या यात्रेतील शेवटची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनी उपस्थिती लावली तसेच सभेत त्यांनी आपल्या भूमिकाही मांडल्या.
पण सभा संपल्यानंतर निवदेन देण्यावरुन गोंधळ निर्माण झाला, त्यामुळं रोहित पवार चांगलेच संतापले आणि ते स्वतः सरकारला निवेदन देण्यासाठी विधानभवनाकडं निघाले. पण पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तसेच काही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जही केला.
रोहित पवारांनी स्वतः ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, पुण्यापासून नागपूरपर्यंत युवा संघर्ष यात्रेत ८०० किमीहून अधिक अंतर पायी चालत युवा वर्ग आला. यावेळी या युवा आणि सामान्य लोकांच्या प्रश्नांचं निवेदन देण्यासाठी विधानभवनाकडं निघाले होते. पण हे निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारनं जबाबदार व्यक्तीला पाठवलं नाही, तर भाजपच्या शहराध्यक्षाला पाठवलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले. या वागण्यातून हे सरकार बेजबाबदार, अहंकारी आणि घाबरट आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच खरं म्हणजे युवा संघर्ष यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या सरकारची घाबरगुंडी उडालीय आणि ये डर अच्छा है, असं त्यांनी म्हटलंय.
दडपशाहीपुढे झुकणार नाही जनतेला न्याय देणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण न्यायाची मागणी करणाऱ्यांवर जर सरकारकडून पोलिसांना पुढं करुन अशी दडपशाही केली जात असेल तर या दडपशाहीपुढं आम्ही घाबरणारही नाही आणि झुकणारही नाही पण याविरोधात अधिक त्वेषाने लढू आणि जिंकू, असंही रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे.