पुणे- चिंचवडच्या तळवडे येथील रेड झोन परिसरात अनधिकृतरित्या उभारलेल्या स्पार्क कँडल कारखान्यात शुक्रवारी दुपारी ३ वाजता भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. यामध्ये सहा कामगार महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर सात महिलांसह आठ जण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
याबाबत अधिक माहिती अशी कि तळवडे परिसरात जोतिबा मंदिराजवळ जन्नत शिकलकर यांच्या मालकीचा एक गुंठा जागेत शरद सुतार याने दोन वर्षांपूर्वी एसएनएस या नावाने पत्र्याचं शेड उभारून हा कारखाना सुरु केला येथे १६ महिला व एक पुरुष असे एकूण १७ जण काम करत होते कामगार शटर लावून आत काम करत असत. शुक्रवारी दुपारी काम सुरु असताना अचानक रसायनांचा स्फोट होऊन आग लागली त्यामुळे महिला कामगारांची धावपळ सुरु झाली.
परंतु कंपनीतून बाहेर पडण्यासाठी असलेल्या शटरच्या बाजूलाच आग लागल्याने त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले. धूर आणि आगीच्या ज्वाळांमुळे श्वास कोंडू लागल्याने काही जण आगीतून बाहेर पडले. स्थानिकांनी तातडीने पाण्याचा मारा करत ब्लॅंकेट आणून जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र हे अपुरे ठरले. अग्निशामक दलास याबाबत माहिती मिळताच तातडीने दहा गाड्या दाखल झाल्या त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली.