राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरू मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसले होते. आज राज्य सरकारच्या शिष्टमडळांशी संवाद साधल्यानंतर व शासनाकडून काही आश्वासन दिल्या गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण नवव्या दिवशी मागे घेतले आहे. तर २ जानेवारी 2024 पर्यंत सरकारला त्यांनी वेळ वाढवून दिला आहे. त्यानंतर जर सरकारने शब्द पाळला नाही तर पुढील लढाई ही मुंबईत असेल, आमचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाईल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
शिंदे समितीने दोन महिन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरवात करावी. नात्यातील सर्व व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावीत. सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत आहे. पण, दिलेली ही वेळ शेवटची असेल. यापुढे सरकारला कसलाही वेळ दिला जाणार नाही. मी उंबऱ्याला शिवणार नाही अन् साखळी उपोषण थांबणार नाही. आज आरक्षण फक्त स्थगित होणार आहे, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुरु झाली होती. यावेळी मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, बच्चू कडू, धनंजय मुडे इत्यादी नेत्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली. याआधी दोन माजी न्यायमूर्तींनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांची सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.