देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय हुतात्मा दिन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले.
पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस परेडचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले. दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना शहीद झालेल्या देशभरातील पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. या शहिदांमध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़. २९ जून २०२३ रोजी एरंडोल येथे कर्तव्य बजावत असतांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर, पोलीस नाईक अजय चौधरी यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व मदतनिधीचा धनादेश देत सात्वंन करण्यात आले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकात गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले.
याप्रसंगी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.